"किल्ले सदाशिवगड भेट"
सायंकाळी पाच वाजता मी व मैत्रीण कुठेतरी जाऊया म्हणून बाहेर पडलो अन गाडीवर बसल्यावर ठिकाण निश्चित केले किल्ले सदाशिवगड!
कराडपासून पूर्वेला पाच सहा किलोमीटर अंतरावर ओगलेवाडीला लागून असलेल्या हजारमाची या गावातुन गड चढायला सुरुवात केली. समुद्रसपाटीपासून तीनेक हजार फूट उंची असणाऱ्या गडाला हजारेक पायऱ्या असाव्यात. गडाला लागून पूर्वेला सुरु होणाऱ्या सुर्ली घाटाच्या डोंगररांगांवरती व भोवतीच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता यावे या उद्देशाने शिवरायांनी हा डोंगर ताब्यात घेऊन बांधून काढला असला तरी आज शिवकालीन अवशेष खचितच राहिलेले असतील. मात्र अलीकडील काळात लोकसहभागातून गड संवर्धन व पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत.
गडाच्या पायथ्याशीच असणाऱ्या दत्त मंदिराजवळ वेगाने बुडणाऱ्या सूर्याला कॅमेऱ्यातून नुसत्या तळहातावर कित्येकदा तोलून धरले. सायंकाळच्या उत्साही वातावरणामध्ये चढताना गडाचा विस्तार, विविध भुआकार यांबद्दल आश्चर्य वाटून त्याकडे व बाजूच्या दगडांवरती लिहिलेल्या गड संवर्धनात्मक सुचनांकडे एकमेकींचे लक्ष्य वेधत होतो. त्यातील 'येथे प्रेमी युगुलांना अश्लील चाळे करण्यास मनाई आहे, अन्यथा बेदम चोप दिला जाईल' या धमकीवजा सुचनेतील शेवटच्या भागाची गड उतरेपर्यंत मला काहीवेळा अनावश्यक धास्ती वाटली कारण आम्ही कित्येकदा पायऱ्या सोडून बाजूच्या पायवाटेने चढायचो. किंवा आपल्याला बघणारे, ऐकणारे कोणी नाही याची खात्री झाल्याने ओरडत पळायचो.
कॅमेऱ्याच्या डोळ्यातून स्वतःसह गड व खालील भुप्रदेश टिपत सावकाश चढत निम्यात पोहोचलो असताना वाढणारा अंधार बघून अधिकच थकवा आला. पण दुसऱ्याच क्षणी 'चडेंगे, लडेंगे पण पीचे नाय हटेंगे' ची गर्जना देत उसने अवसान बांधले. अन काही वेळातच गडमाथ्यावर फडकणाऱ्या भगव्या झेंड्याला सलाम केला. धावतच जाऊन काही अंतरावर असणाऱ्या महादेव मंदिरातील पिंड, नंदी, गणपती व त्यापुढे असणाऱ्या मारुती मंदिराचे दर्शन घेतले. तिथेच असणारा बारमाही आड/विहीर व बांधीव तलाव पाहिला. तोवर कुट्ट अंधार पडला होता.
वरती आभाळभर टिपूर चांदणे पडले होते तर लक्ष्य दिव्यांचे पिठुर चांदणे गडाच्या चहूबाजूंनी धरतीवर उजळले होते. पश्चिमेकडून वाहणाऱ्या शांत व थंड वाऱ्याचा स्पर्श अनुभवणे हवेहवेसे वाटत होते. चार पाच एकरच्या गडमाथ्यावर पूजाऱ्याशिवाय कोणीच नसल्याने शिवाशिवी खेळत, गाणी बेसुरपणे ओरडत गड उतरायला सुरुवात केली. पायथ्याजवळ ढोलकीचा आवाज येताच त्या तालावर हास्यास्पद नाचण्याचा मनसोक्त आनंद लुटला. अन पुढे येऊन पायथ्याजवळच्या दुकानात बिस्कीट खाऊन पाणी पिल्यावर ऊर्जा आलिसे वाटताच समोरच भरलेल्या गावातील आठवडी बाजारात घुसलो.
No comments:
Post a Comment